Posted On July 22, 2025

आर्थिक साक्षरता म्हणजे काय रे भाऊ?

Admin 0 comments
अर्थबोध >> गुंतवणूक >> आर्थिक साक्षरता म्हणजे काय रे भाऊ?

काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाने एक चिंता व्यक्त केली होती, की भारतात पारंपरिक गुंतवणूक न होता. भांडवली बाजारात त्या गुंतवणुकीचा कल मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एका मित्रासोबत यावर चर्चा करत असताना, पारंपरिक गुंतवणूक (Investment) म्हणजे काय यावर तो अडकला. त्याला समजलंच नाही. मग मी त्याला सहज प्रश्न केला की बाबा तू सध्या कुठे गुंतवणूक करतो. गुंतवणूक?? तो पुन्हा स्तब्ध झाला. मग त्याच्या कोर्टात मी हळूच दुसरा प्रश्न टाकला, की आर्थिक साक्षरता म्हणजे तरी तुला माहिती आहे की नाही? तो परत बुचकळ्यात पडला. असेही नाही की, तो कमावता नाही. पण, त्याला या सोप्या प्रश्नांची उत्तर माहिती नव्हती. मग सामान्यांचं काय? कारण, आर्थिक साक्षर होणं हे स्वत: पुरते मर्यादित नाही आहे.  म्हणूनच आज आर्थिक साक्षरता म्हणजे काय याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

आपण दिवसरात्र मेहनत करुन पैसा कमवत असतो. तसेच, जेव्हा पैसा खर्च करायची वेळ येते, तेव्हा कोणताही विचार न करता वारेमाप खर्च करत सुटतो.  ज्या ठिकाणी खर्च करायची गरज नसते, तेथेही आपण खर्च करतो. मग अचानक एखाद्या वेळी कोणती तरी इमर्जन्सी येते, तेव्हा पैशांची जमवा-जमव करताना नाकी नऊ येतात. ही परिस्थिती का उद्भवते? कारण, आपले पैशांबाबतीत कोणतेच नियोजन नसते. बरोबर? मग पैशांचा योग्य वापर कसा करावा, हे माहिती असणे म्हणजेच आर्थिक साक्षर असण्याच्या मार्गातील पहिली पायरी होय. तसेच, पैसा काय आहे? पैशांचा उपयोग कसा करायचा? आपले पैसे वाढवण्यासाठी काय करायचे? आपल्या जवळचे पैसे कुठे आणि कसे गुंतवायचे? गुंतवल्यावर परतावा किती मिळू शकेल? या सर्व गोष्टींची माहिती आणि जागरुकता असण्यालाही आर्क्षिक साक्षरता म्हणतात.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपला पैसा कसा आणि कुठे गुंतवायचा, तसेच तो कुठे खर्च करायचा याचं सर्व ज्ञान असणे म्हणजेच आर्थिक साक्षरता होय. त्यामुळे आर्थिक साक्षरता हा मानवाच्या आयुष्यातील सर्वांत मोठा घटक आहे. मात्र, अजूनही बऱ्याच जणांना त्याच्याविषयी काहीही मागमूस नाही. पण, आर्थिक साक्षरता सर्वांच्या उपयोगाची आणि महत्वाची असल्यामुळे याविषयी सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे.

आता हे झाले आर्थिक साक्षरतेविषयी पण याबद्दल माहिती असणे का गरजेचे आहे. कारण, आपण आलो म्हणजे आपले कुटुंब आले, आपला मित्र परिवार आला. तसेच, आपला व्यवसायही आला.  त्यामुळे या सर्वांना आर्थिक बाबतीत समृद्ध करण्यासाठी, भविष्य काळात येणार्‍या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आणि आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपल्याला आर्थिक साक्षरतेबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. हे फक्त आपल्या स्वत: पुरते नसून यामुळे आपण राष्ट्र प्रगतीलाही खूप मोठी मदत करत असतो. तसेच, आपण अर्थसाक्षर असल्यामुळे त्याचा आपल्या देशाच्या विकासावरही सकारात्मक प्रभाव पडतो.

याशिवाय लोकांना योग्य गुंतवणूक करण्यासाठी ज्ञान देणे,  एखादा कर्जाच्या कचाट्यात सापडला असेल तर त्यातून कसं बाहेर निघायचं? याची जनजागृती आपल्याला अर्थसाक्षरतेच्या माध्यमातून करता येते.

काही ग्रामीण भागात अजूनही बरीच वाईट परिस्थिती आहे. लोकांना अजूनही बॅंकेत खाते कसे उघडायचे? बचत कशी करायची? बचतीच्या पद्धती किती आहे? गुंतवणूक काय आहे?  कर्ज काय आहे? कर्जाचे प्रकार कोणते आहेत? आणि  विमा काय आहे? अशा बऱ्याच गोष्टींची ग्रामीण भागातील नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे प्रगती नावाचा प्रकार त्यांच्या आयुष्यात जवळपास नसल्यातच जमा आहे. फक्त कष्ट आणि कष्ट हाच एककलमी कार्यक्रम त्यांचा सुरू असतो. पण, या चक्रात ग्रामीण भागातीलच नाही तर सर्वच स्तरातील नागरिक अडकलेले आहेत. पण, गुंतवणुकीचे काही सोपे पर्याय आहेत. यामध्ये मुदत ठेव (FD), आवर्ती ठेव (RD), म्युच्युअल फंड (Mutual Fund),  सोने (Gold), भांडवली बाजार (Share Market) आणि इंडियन पोस्ट (Indian Post) यासह सरकारच्या काही योजनांमध्ये आपल्याला गुंतवणूक करता येते. फक्त त्याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.   

आता आपल्याला आर्थिक साक्षरतेचे महत्व कळले असेल अशी अपेक्षा आहे. तसेच, आपणही लवकरात लवकर नियोजन करुन आर्थिक साक्षरतेच्या दिशेने पाऊल टाकावे, यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

अर्थबोधने आर्थिक साक्षरतेची चळवळ सुरू केली आहे. जिच्या माध्यमातून नागरिकांना आर्थिक साक्षर होण्याचे धडे देऊन,  त्यांनाही अर्थशाहीच्या मुख्य प्रवाहात आणता येईल. तसेच,  समाजातील आर्थिक विषमतेची दरी कमी करता येईल.  मात्र, यासाठी सर्वांनी अर्थबोधच्या अर्थसाक्षर चळवळीत सहभागी होणं गरजेचे आहे. तसेच, हा लेख सर्व गरजूंपर्यंत पोहचवणेही तेवढंच आवश्यक आहे. म्हणून हा लेख शेअर करा आणि खऱ्या अर्थाने अर्थसाक्षर चळवळीत सहभागी व्हा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

काय करणार पैशाचं, बचत की गुंतवणूक? सविस्तर समजून घ्या..

आत्ताच्या पिढीला गुल्लकचीच अपग्रेड आवृत्ती पिगी बॅंक माहिती आहे. पण, तांदळाच्या, दाळीच्या डब्ब्यात ठेवलेले पैसे…