आत्ताच्या पिढीला गुल्लकचीच अपग्रेड आवृत्ती पिगी बॅंक माहिती आहे. पण, तांदळाच्या, दाळीच्या डब्ब्यात ठेवलेले पैसे त्यांना क्वचितच पाहायला मिळत असतील. कारण, आता याची जागा कपाटातील चोर कप्प्याने घेतली आहे. मात्र, पैसे घरीच एखाद्या डब्ब्यात, गुल्लकमध्ये, ड्रावरच्या चोर कप्प्यात ठेवणे, यालाच बरेच जण बचत समजतात. हो की नाही? तुम्हीही बचतच समजता का? मग गुंतवणूक म्हणजे काय? हा अचानक आलेला प्रश्न, सर्वांना गोंधळात टाकून गेला. कारण, एकालाही या दोघातील फरक स्पष्ट करता आला नाही. आपण सगळेच जण एवढी मेहनत करुन पैसे कमवतो. त्यानंतर अनेक जण जसं जमेल तसं पैसे जमा करत असतात. त्यामुळे या दोघातला फरक सगळ्यांना माहिती होणे गरजेचे आहे. म्हणूनच आज आपण बचत आणि गुंतवणूक म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत.
बचत आणि गुंतवणूक या दोन्हींमध्ये अनेकांचा गोंधळ होतो. यात दुमत नाही. आता आपण बऱ्यापैकी सर्वच जण बॅंकेत मुदत ठेव आणि आवर्ती ठेव करतो, पोस्टाच्या खात्यात पैसे टाकतो आणि वरेचवर सोने खरेदी करत राहतो. या सर्व गोष्टींना आपण गुंतवणूक समजतो. बरोबर? पण ही गुंतवणूक नसून बचत आहे. आता तुम्ही म्हणाल मग गुंतवणूक काय आहे. प्रश्न रास्त आहे. आपण महागाई दराविषयी कधी तरी ऐकलं असेल, वाचलं असेल. त्याच्यावर मात करण्यासाठी आपल्याजवळील एकमेव ब्रम्हास्त्र म्हणजे गुंतवणूक होय. आता आपण पहिल्यांदा बचतीविषयी पाहू..
बचत काय आहे?
बचत म्हणजे फक्त पैसे जमा करणे नव्हे. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, आपल्या कमाईतील एकूण रकमेतील खर्च केल्यावर जी रक्कम शिल्लक राहते ती म्हणजे बचत होय. हीच रक्कम भविष्यातील काही छोट्या-मोठ्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी लावून ठेवली जाते. आपण बचतीच्या जोरावर आर्थिक संकटावर सहज मात करु शकतो. बचत ही तुम्हाला आयुष्याचा प्रवास सुखकर होण्याची खात्री देते. विशेष म्हणजे बचत केलेला पैसा तुम्ही कधीही त्वरित काढू शकता. याशिवाय तुम्ही आर्थिक स्थैर्य मिळवून, तुमच्या आयुष्याला थोडा आराम बचतीमुळे देऊ शकता.
गुंतवणूक काय आहे?
बचत आणि गुंतवणुकीत साम्य वाटत असले तरी या दोघात जमीन आस्मानचा फरक आहे. गुंतवणूक म्हणजे अशी ठरवून केलेली गोष्ट होय, ज्यामध्ये आपण अधिक परतावा मिळवण्यासाठी पैसे गुंतवले आहेत. हेही कमाईतील तोच खर्च केल्यानंतर शिल्लक राहिलेला पैसा आहे. हा पैसा दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी ठेवला जातो. तसेच, यातून अधिक परतावा मिळावा हा मानस असतो. म्हणून हा पैसा लगेच काढता येत नाही. म्हणून गुंतवणुकीत पैसा टाकल्यावर एका विशिष्ट अवधीसाठी तो विसरुन जाणे हाच एकमेव पर्याय उरतो.
बचत आणि गुंतवणुकीत फरक
| बचत | गुंतवणूक |
| ही अल्प अवधीसाठी केली जाते. | ही दीर्घकाळासाठी केली जाते. |
| बॅंकेतील एफडी, आरडी, पीपीएफ, इपीएफ, बचत गट आणि पोस्टात केली जाते. | म्यूच्यूअल फंडातील एसआयपी, रियल इस्टेट, शेअर मार्केट, शुद्ध सोने यामध्ये केली जाते. |
| पैशांवर परतावा कमी (ठरलेला व्याजदर) | पैशांवर परतावा अधिक (गुंतवणुकीनुसार) |
| पैसा कधीही हाताशी उपलब्ध | पैसा सहज उपलब्ध नाही |
| बचत कधीही सुरु करता येते | गुंतवणुकीला कमी वयातच प्रारंभ करणे गरजेचे |
| छोटे हेतू साध्य करण्यासाठी | मोठे हेतू साध्य करण्यासाठी |
| जोखीम कमी आहे | जोखीम अधिक असू शकते (गुंतवणुकीनुसार) |
दोन्हींची आहे आपली खासियत!
बचत असो की गुंतवणूक दोन्ही आपल्या आयुष्याला उज्ज्वल करण्याचीच शिडी आहे. फक्त दोन्हींचा सदुपयोग करता येणे आवश्यक आहे. कारण, बचत ही आपले ठराविक आणि अल्पावधीतील ध्येय पूर्ण करण्यास मदत करते. गुंतवणूक दीर्घकालीन उद्दीष्टांसाठी आहे. अजून दोन्हीत महत्वाची गोष्ट म्हणजे बचतीची जे माध्यम आहेत त्यातून परतावा कमी मिळतो. तर गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळू शकतो. पण, यामध्ये जोखीमही तेवढीच आहे. यामुळे गुंतवणूक करताना पूर्ण अभ्यास करुन मार्केटमध्ये उतरणे आवश्यक आहे. तर बचत करताना तुम्हाला अभ्यास करण्याची गरज नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी सुयोग्य व्याजदर मिळत आहे, त्या ठिकाणी तुम्ही पैसे बचत करु शकता.
